आरोपी लक्ष्मण खाडे यांना अंतरिम जामीन देण्यास न्यायालयाकडून दुसऱ्यांदा नकार
लक्ष्मण खाडे यांना अटक करून तपास करणे अत्यावश्यक असल्याचा क्राईम ब्रँचचा ठोस अहवाल न्यायालयात सादर.
पोलिसांचा हा अहवाल आणि सत्र न्यायालयाचे आदेश हे आरोपी लक्ष्मण खाडे व त्यांच्या सह-आरोपींसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
खोटे शपथपत्र देऊन न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी कोर्ट-अवमानना कारवाईसाठी नवीन प्रकरण दाखल; सुनावणी 16 डिसेंबरला
नागपूर :
परिवहन विभागात बदल्यांचे रॅकेट चालवून गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे केल्याच्या आरोपांनंतर निवृत्त अधिकारी लक्ष्मण खाडे आणि इतर सह-अधिकाऱ्यांविरुद्ध सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 409, 166, 167, 120-बी, 34 इत्यादींअंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. विशेष म्हणजे भादंवि 409 अंतर्गत आजीवन कारावासाची शिक्षेची तरतूद आहे.
या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपविण्यात आला असून, क्राईम ब्रँचनं सर्व पुरावे आणि कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करून आरोपी लक्ष्मण खाडे यांच्या अटकेची तयारी सुरू केली आहे.
यामुळे घाबरून जाऊन आरोपी लक्ष्मण खाडे यांनी अटक टाळण्यासाठी [Bail Application No. 3744 of 2025] हा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयात धाव घेत दाखल केला आहे.
त्या अर्जावरील अंतरिम जामीनाच्या मागणीवर सुनावणीदरम्यान प्रभारी सत्र न्यायाधीश श्री. यादव यांनी अंतरिम जामीन नाकारत, प्रकरण संबंधित नियमित न्यायाधीशांकडे पाठविण्याचा आदेश दिला. [Date : 28.11.2025]. उल्लेखनीय म्हणजे याच प्रभारी न्यायाधीशांनी सह-आरोपी विजय चव्हाण यांना तात्पुरता अंतरिम जामीन मंजूर केला होता.
परंतु आरोपी लक्ष्मण खाडे यांना अंतरिम जामीन नाकारल्यामुळे पोलीसांना त्यांना अटक करण्याच्या अधिकाराला अधिक बळ मिळाले आहे.
यानंतर 8 डिसेंबर 2025 रोजी सत्र न्यायाधीश श्री. धुळधुळे यांच्यासमोर सुनावणी झाली असता, फिर्यादी श्री. राशिद खान पठाण यांचे वकील अॅड. निलेश ओझा, ओंकार काकडे, चंद्रकांत रोहनकर व इतरांनी न्यायालयाचे लक्ष वेधले की —
आरोपी लक्ष्मण खाडे आणि त्यांच्या वकिलांनी न्यायालयात खोटे, दिशाभूल करणारे आणि कायदेशीररीत्या असत्य शपथपत्र दाखल करून न्यायालयाची फसवणूक केली आहे.त्यामुळे लक्ष्मण खाडे व त्यांच्या वकिलांवर कोर्ट-अवमानना अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली.
प्राथमिक सुनावणीनंतर सत्र न्यायाधीश श्री. धुळधुळे यांनी आरोपी लक्ष्मण खाडे यांच्या अंतरिम जामीन मागणीवर सादर केलेल्या कागदपत्रे, पोलिसांचा अहवाल आणि आरोपीविरुद्धचे गंभीर आरोप यांचा सर्वांगीण विचार करून अंतरिम जामीन देण्यास असमर्थता दर्शवली आणि ती विनंती नाकारली. या निर्णयानंतर न्यायालयाने प्रकरणाची अंतिम सुनावणी 16 डिसेंबर रोजी ठेवून त्या वेळी आरोपीविरुद्धच्या मूळ जामीन अर्जाबरोबरच खोटे शपथपत्र दाखल करून न्यायालयाची दिशाभूल केल्याच्या आरोपांवर आधारित कोर्ट-अवमानना कार्यवाहीसाठीही पुढील कार्यवाही होणार आहे.
दरम्यान, पोलिसांनी सादर केलेल्या तपशीलवार अहवालात लक्ष्मण खाडे यांच्या गुन्हेगारी कृत्यांची पुरेपूर पुष्टी मिळत असून, त्यांना अटक करून सखोल तपास करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे.
पोलिसांचा हा अहवाल आणि सत्र न्यायालयाचे आदेश हे आरोपी लक्ष्मण खाडे व त्यांच्या सह-आरोपींसाठी मोठा धक्का मानला जात आहेत. या प्रकरणाकडे संपूर्ण परिवहन विभागासह राज्यातील कायदा-सुव्यवस्था यंत्रणेचे विशेष लक्ष लागले आहे.